रेशीम मार्ग नावातच एक वेगळ आकर्षण असणारा हा आंतरराष्ट्रीय रस्ता पूर्वे पासून पश्चीमे पर्यंत जोडला गेलेला आहे. ऐतिहासिक काळापासून व्यापार उदीम करण्यासाठी चीन मधून दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे म्हणून हा मार्ग ओळखला जायचा. विशेषत: चीनमधून मोठ्या प्रमाणावर रेशमाचा व्यापार या मार्गावरून होत असल्यामुळे रेशीम मार्ग असे पडले व तेच प्रचलित झाले. या रेशीम मार्गाला जसा ऐतिहासिक वारसा आहे तशाच त्याच्या भौगोलिक कक्षा देखील विस्तीर्ण आहेत .
सागरी व जमिनीवर पसरलेला हा मार्ग प्रामुख्याने Shaanxi, गान्सू, Hexi कॉरिडॉर आणि Xinjiang Uygur स्वायत्त प्रदेश, अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशिया यांना जोडणारा आहे. प्राचीन काळात झान्ग्यान इथून रेशीम मार्ग उदयाला आला. अत्यंत अलिशान श्रीमंत असा लौकिक असलेले शहर. इथूनच रेशमासारख्या महागड्या वस्तूंची निर्यात या मार्गावरून व्हायला लागली. इथला रम्य निसर्ग व ऐतिहासिक वस्तु तसेच नैसर्गिक कला यामुळे हा मार्ग नेहमीच महत्वाचा ठरला. रस्त्याच्या बाजूला दिसणारे घोडे, जंगली हंस व पक्षी यामुळे निसर्गाचा वरद हस्त असलेला हा रस्ता युनेस्को च्या जागतिक वारसा हक्काच्या नामांकनात दिमाखाने मिरवत असतो. विशेषत: उत्तर चीन, मध्य युरोप व मध्य अमेरिका येथे आढळणारी अत्यंत सुपीक अशी पिवसार करड्या रंगाची माती इथली समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करते.
गेली कित्येक शतक हा रेशीम मार्ग फक्त व्यापाराच नाही तर विविध भाषा, संस्कृती आचार विचार आदान प्रदान करणारा एक मूक साक्षीदार आहे. कित्येक उन्हाळे पावसाळे व बदलते ऋतू चक्र बघणाऱ्या रेशीम मार्गाने जागतिक विकासाला निश्चितच हातभार लावला आहे. सन २०१४ साली युनेस्को ने रेशीम मार्गाचा काही भाग जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केला, तो फक्त त्याला इतिहासिक महत्व आहे म्हणून नव्हे तर बदलत्या काळातील विकासाच्या वेगा मुळे तिथले नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता नष्ट होऊ नये म्हणून. त्याच बरोबर तिथल्या मानवी जीवनावर शाश्वत विकासाची मोहर उमटावी या साठी घेतलेला हा निर्णय फार महत्वाचा आहे.
नुकत्याच संपलेल्या लिमा काँग्रेस मध्ये रेशीम मार्ग तिथले जीवन व शाश्वत विकास यावर एक परिसंवाद आयोजित केला गेला होता. या परिसंवादाच्या निमित्ताने रेशीम मार्गाच्या आजूबाजूच्या वसाहती व त्यांचे जीवनमान यांचे विश्लेषण करताना त्याचा संदर्भ आपल्या पश्चिम घाट व तिथल्या जीवनाशी मिळत्या जुळत्या आहेत असं मनात आल्या शिवाय राहिला नाही. मुळात तिथली जीव विविधता हे सर्वात महत्वाची त्यामुळे रेशीम मार्ग हा अनेक प्राणी मात्रांना, निसर्ग साधन संपत्तीना जीवदान देतो पण त्याच बरोबर व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या देश विदेशातील व्यापारी किवा व्यासायिक लोकांमुळे तिथल्या संस्कृती परंपरा राहणीमानाची देवाण घेवाण होत असते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या अंगातल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वताच्या उदार निर्वाहाचे साधन आपोआपच उपलब्ध होईल. मानव व निसर्ग हा एक अभिनव उपक्रम या निमित्ताने लोकांपर्यंत पोचेल.
रेशीम मार्ग हा अनेक देशांच्या मधून जात असल्यामुळे अर्थातच देशांच्या सीमा, प्रत्येक देशाची जमीन, सागरी मार्गाची नियमावली या सर्व बाबी येतातच किंबहुना त्यावर अंतर राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चर्चा घडत असतातच पण या नियमावल्या पळून सुधा मानव व निसर्ग हे नातं टिकवून ठेवणारा हा एक आदर्श आहे. युनेस्को च्या सांस्कृतिक वारसा हक्काच्या यादीतला याचा काही भाग आता शाश्वत पर्यटनासाठी विकसित करावा व त्या प्रकल्पामुळे त्या त्या भागातल्या कला कौशल्य विकसित करून तिथल्या लोकांचा जीवनमान उंचवाव असा या मानव व निसर्ग कार्यक्रमाचा उद्देश. मी तेर पॉलीसी सेंटर च्या माध्यमातून नेहमीच जागतिक स्तरावरचे प्रकल्प स्थानिक स्तरावर राबवण्याचा प्रयत्न करत असते, पश्चिम घाटातल्या कास पुष्प पठारावर सुधा शाश्वत पर्यटना साठी व तिथल्या रहिवाश्यांच्या शाश्वत विकास साठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून काही प्रकल्प राबवले जातात. अनेक वेळा इको सेन्सेटिव झोन म्हटला कि तिथल्या रहिवाशांना सुधा इथे कुठल्याच सुधारणा होणार नाहीत कि काय अशा शंका भेडसावायला लागतात पण खरा सांगायचा तर तिथल्या रहिवाशांनी आपल्यातल्या कला गुणांचा विकास, आपल्या जवळच्या साधन संपत्तींचा नाश न करता नवीन संधी शोधून मानवी जीवन व निसर्ग या दोन्हीचाही विकास करता येण फारसा कठीण नाही.
आपल्या पश्चिम घाटा चे जसे आकर्षण सर्वत्र बघायला मिळते तसेच या रेशीम मार्गाचे आकर्षणही सर्वत्र आहे. रेशीम मार्गावरही अनेक कविता केल्या गेल्या आहेत. एका टर्किश कवीने रेशीम मार्गातील एका खोर्यावर लिहिलेली कविता खूपच उद्बोधक वाटली म्हणून त्याचा स्वैर अनुवाद इथे लिहिते आहे,
स्वप्नमय वाटणारी हि फर्घना दरी,
रेशमाच्या लडी सारख्या हळुवार उलगडत गेलेल्या त्यातल्या पाऊल वाटा
अनेक जुन्या संस्कृतींचा गाठोडं घेऊन चालणारा तो म्हातारा
अचानक भीतीने काजळून गेलेली ती काळी कभिन्न रात्र
सुंदर स्वप्नांच्या निसर्ग चित्रावर दौडणारे ते दमदार घोडे,
मनुष्याच्या इतिहासातल्या वैश्विक धुळी पासून ते भविष्यातल्या
शाश्वत विकासाकडे नेणारे हे माखमाली रस्ते,
त्यातला अंतिम सत्य कोणत?
आले गेलेले अनेक धर्म , कि संस्कृतींचा ताळमेळ
देशांच्या सीमा कि भाषांचे अडसर?
कदाचित सगळच पुसट माझ्या अंधुक दृष्टी सारख,
संस्कृती येतील , भाषा लूप्त होतील
पण निसर्गाचा वरद हस्त असलेलं फार्घना खोर
टिकून राहील, रेशीम मार्गासारखा अविरत,अविश्रांत !